विश्वगुरू... पहिल्या 300 विद्यापिठात एकही भारती विद्यापीठाचा समावेश नाही.
THE
द हायर एज्युकेशन यांच्या प्रकाशित झालेल्या चालू वर्षाच्या अहवालानुसार जागतिक विद्यापीठाच्या क्रमवारीमध्ये पहिल्या 300 विद्यापीठांमध्ये एकही भारती विद्यापीठाचा समावेश नाही ही चिंतेची व तसेच चिंतनाची सुद्धा बाब आहे.
केंद्रातील मोदी सरकारने भारताला विश्वगुरू करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे, उद्दिष्ट तसे चुकीचे नाही कारण बौद्ध कालीन भारतामध्ये विश्वातील पहिले विद्यापीठ तक्षशिला इसवीसनपूर्व ८ ते ४ शतकापर्यंत कार्यरत होते. पाश्चिमात्य देशांमध्ये जेव्हा शाळा अस्तित्वात नव्हत्या तेव्हा बौद्ध तत्त्वज्ञानाच्या प्रसारामुळे भारतात अनेक विद्यापीठे नावारूपास आली होती. त्यामध्ये तक्षशिला, नालंदा, ओदांतपुर, सोंमपुरा, जगदला, नागार्जुन कोंडा, विक्रमशिला, वल्लभी ,सारनाथ, कांचीपुरा, माण्याखेत, पुष्पगिरी, रत्नागिरी आणि श्रीलंकेमधील बौद्ध विद्यापीठ सुनेत्रदेवी पिरीवेना या सारखे अनेक बौद्ध विद्यापीठ यांनी त्यावेळी जागतिक मान्यता प्राप्त केली होती. बौद्ध कालीन भारत हा खऱ्या अर्थाने विश्वगुरू होता.
पण द हायर एज्युकेशन च्या अहवालानुसार २ sept २०२१(२०२१_२२) यावर्षी तेरा निकष आधारावर पहिल्या 300 विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही. ऑक्सफर्ड विद्यापीठाने पुन्हा एकदा जगामध्ये प्रथम क्रमांकाचे विद्यापीठाचा मान पटकावला आहे. जगातील पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये आठ विद्यापीठे अमेरिकेतील व दोन विद्यापीठे इंग्लंडमध्ये आहेत. या यादीमध्ये भारताचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलरु हे देशातील पहिले विद्यापीठ पण जागतिक क्रमवारी 301 ते 350 या गटात आहे. या सर्वेक्षणामध्ये गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी आयआयटी ( दिल्ली, मुंबई, चेन्नई ,गोहाटी, रूडकी ,खरकपूर व कानपूर) यांनी सहभाग घेतला नाही. विविध तेरा निकष असले तरी प्रामुख्याने शिक्षणाचा दर्जा, संशोधन ,मिळवलेले पेटेंट अशा काही प्रमुख निकषच्या आधारावर हे मानांकन दिले गेले. जामिया मिलिया इस्लामिया व जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली ६०१ क्रमांकाच्या गटामध्ये आहेत, महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे ८०१ या गटामध्ये आहे.
इसवी सन पूर्व काळात जगाला पहिले विद्यापीठ तक्षशीलेच्या स्वरूपात देणारा भारताचा हा वर्तमानात काळात पहिल्या 300 विद्यापीठांमध्ये सुद्धा समाविष्ट होऊ नये यावर शासन गंभीरपणे विचार करावा.
महात्मा फुले ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला प्राधान्य दिले. व्यक्ती असो किंवा राष्ट्र जे शिक्षण आणि संशोधन व वैज्ञानिक दृष्टी कोणाला प्राधान्य देते ते प्रगती करते. जगातील पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये अमेरिकेतील आठ विद्यापीठाचा समावेश आहे यातच अमेरिकेच्या प्रगती ची गुरुकिल्ली दडलेली आहे. अमेरिका का महासत्ता आहे कारण ते शिक्षणामध्ये सुद्धा महासत्ता आहेत.भारताला महासत्ता आणि विश्व गुरु करायचे असल्यास महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना
आदर्श मानून शासनाने आपली शैक्षणिक धोरण ठरवणे आवश्यक आहे.
केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण आणले आहे, भविष्यशास्त्र या अवैज्ञानिक विषयांचा समावेश विद्यापीठातील अभ्यासक्रमात केल्या जात आहे. अशा धोरणामुळे भारत विश्वगुरू तर होणारं नाहीच उलट भारतीयांचे शैक्षणिक आर्थिक व एकंदरीत प्रगतीचे भविष्य पण धोक्यात येईल .
भारतात कृषी क्रांती झाली, दूध क्रांती, मत्स्य क्रांती अशा अनेक क्रांत्या भारतामध्ये झाल्या, पण भारतातील कोणत्याही राजसत्तेने शिक्षण क्रांती करण्याची घोषणा किंवा तसा प्रयत्न केला नाही. जोपर्यंत भारतात शिक्षण क्रांती होणार नाही तोपर्यंत भारत हा महासत्ता किंवा विश्वगुरू होणार नाही. शिक्षणास राष्ट्र विकासाचा पाया म्हणून अशा प्रकारच्या शासकीय ध्येय धोरणाची निश्चिती करणे काळाची गरज आहे.
..
दीपक कदम
प्रमुख ,आंबेडकरवादी मिशन.